तुझे विश्वच वेगळे!

कसे सांगू सखे तुज
माझ्या मनातले भाव
नाही सामर्थ्य शब्दांना
त्यात प्राणाचा अभाव

माझ्या अंतरीचे भाव
त्यांना सागराची खोली
मुग्ध लाजरे अबोल
जणु उत्फुल्ल अबोली

कशी कळावी गे तुला
माझी जळणारी कथा
सदा बोचणारे शल्य
मनी खुपणारी व्यथा

स्वप्न स्वप्निल मनाचे
गेले कधीच विरुन
आणि प्रतिक्षा तुझी गे
दिले करणे सोडून

कसे सांगू सखी तुज
गुज माझ्या मनातले
कशी कळावी वेदना
तुझे विश्वच वेगळे!

मूळ कवी:सोनाली

No comments: